25 – पैसा

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: पैसा.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.

येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.” त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतु येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला नाही कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 384 परिच्छेद

काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला

त्या काळी अब्राम फार श्रीमंत झाला होता; त्याच्याजवळ पुष्कळ गुरेढोरे, शेरेडेमेंढरे, गाढवे व उंट तसेच सोने चांदी इत्यादी भरपूर होते.

अब्राम व लोट यांची गुरेढोरे इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहाण्यास ती जागा व तो प्रदेश पुरेना,

त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला.

परमेश्वराने माझ्या स्वामीला सर्व बाबतीत आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण केले आहे. माझा स्वामी आता एक थोर माणूस झाला आहे; परमेश्वराने त्याला मेंढरांचे कळप, गुराढोरांची खिल्लारे तसेच खूप सोने. चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.

त्याने नवरीसाठी आणलेल्या मोलवान भेटवस्तू म्हणजे हिरेमाणके यांनी मढवलेले सोन्याचांदीचे दागदागिने व बरीच सुंदर वस्त्रे रिबकेला दिली; त्याचप्रमाणे त्याने तिचा भाऊ व तिची आई यांना ही मोलवान देणग्या दिल्या.

इसहाकाने त्या देशात धान्य पेरले; आणि त्या वर्षी त्याला भरमसाट पीक आले. परमेश्वराने त्याला भरपूर आशीर्वाद दिला. इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला; त्याच्याकडे शेरड्यामेंढ्यांचे कळप व गुराढोरांची खिल्लारे पुष्कळ होती; त्यावरुन पलिष्टी लोक त्याचा हेवा करु लागले;

मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेवराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.”

योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते.

तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत. मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.

आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या घरचे सर्व यांना भरपूर अन्नसामग्री पुरवली.

त्यावेळी दुष्काळ तर फारच कडक झाला. देशात अन्नधान्य कोठेच मिळेना; त्यामुळे मिसर व कनान देश या वाईट परिस्थितीमुळे हवालदील झाले. लोकांनी अधिकात अधिक धान्य विकत घेतले; योसेफाने धान्य विक्रीचे पैसे साठवून फारोच्या वाड्यात आणले. काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले. त्यांच्या जवळचे सर्व पैसे अन्नधान्य विकत घेण्यात खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिले नाही. त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! कृपा करुन आम्हाला धान्य द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत; आम्हाला जर काही खावयास मिळाले नाही तर तुमच्या डोळ्यादेखत आम्ही मरुन जाऊ.” परंतु योसेफ म्हणाला, “तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या म्हणजे मग मी तुम्हाला धान्य देईन.” तेव्हा लोकांनी त्याच्याकडील गुरेढोरे शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले; आणि त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले. परंतु त्याच्या नंतरच्या वर्षात लोकांच्यापाशी असलेली गुरेढोरेही संपली व अन्नधान्य विकत घेण्यास त्यांच्या जवळ काहीही राहिले नाही; म्हणून मग लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! आपणास माहीत आहे की आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही तुमची झाली आहेत; तेव्हा आमच्याकडे आता आपणास दिसतात ती फक्त आमची शरीरे व आमची जमीन या शिवाय दुसरे काहीही राहिलेले नाही. आता मात्र आपण बघत असताना आम्ही नक्की मरुन जाऊ; परंतु जर आपण आम्हास अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमची जमीन फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ; कृपा करुन आम्हाला बियाणे द्या म्हणजे आम्ही ते पेरु; मग मात्र आम्ही जगू, मरणार नाही; आणि आमची जमीन आम्हांस धान्य देईल.” तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमीनी योसेफाने फारोकरिता विकत घेतल्या; मिसरच्या लोकांनी आपल्या शेतजमिनी योसेफाला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता. मिसरमधील सर्व लोक फारोचे गुलाम झाले.

प्रत्येक इब्री स्त्री म्हणजे इस्राएली स्त्री आपल्या मिसरमधील शेजारणीकडून व आपल्या घरात राहाणाऱ्या मिसरच्या स्त्रीकडून भेट वस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेट वस्तू देतील; तुम्हा लोकांना सोन्याचांदीचे दागिने व उंची कपडे भेट म्हणून मिळतील. मिसरमधून निघताना त्या वस्तू तुम्ही आपल्या मुलांमुलीच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसरच्या लोकांची संपत्ती घ्याल.”

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरिता मी आकाशातून अन्न पडावे असे करीन; दर दिवशी लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. मी सांगतो त्याप्रमाणे लोक करतात की नाही हे पाहण्यासाठी मी हे करीन. दरदिवशी लोकांनी एक दिवस पुरेल एवढेच अन्न गोळा करावे, परंतु शुक्रवारी जेव्हा ते जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते जेवण दोन दिवस पुरेल इतके करावे.”

मोशेने लोकांना सांगितले, “दुसऱ्या दिवसासाठी ते अन्न ठेवू नका.” परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून काही बाकी ठेवले आणि त्या ठेवलेल्या अन्नात किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. तेव्हा असे करणाऱ्यावर मोशे फार रागावला.

“चोरी करु नकोस.

“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

माझ्या स्पर्धेत तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती करु नये असे खोटे देव तुम्ही करता कामा नये.”

जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन गुलाम म्हणून विकेल किंवा गुलाम म्हणून स्वत:कडे ठेवेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.

“एखाद्याने आपल्या शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही चीजवस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व शेजाऱ्याच्या घरातून चोरीस गेले तर तुम्ही चोर शोधून काढण्याचा प्रयत्न करावा आणि चोर सापडला तर त्याने चोरीस गेलेल्या वस्तूच्या किंमतीच्या दुप्पट किंमत भरून द्यावी. परंतु जर चोर सापडला नाही तर घरमालकाला देवासमोर किंवा न्यायाधीशसमोर न्यावे म्हणजे मग त्याने स्वत:च त्या वस्तू चोरल्याचा दोष त्याच्यावर येतो की काय याचा न्याय, देव किंवा न्यायाधीश करील.

“माझ्या एखाद्या गरीब इस्राएल माणसाला तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारु नये व पैसे लवकर परत करण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावू नये.

“इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. प्रत्येक माणसाने माझ्यासाठी काय अर्पण आणावयाचे ते मनापासून ठरवून आणावे; ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.

परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ;

ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.

“लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करवयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!” तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम सोडला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अधिक अर्पणे आणू नयेत.” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली. लोकांनी हे काम पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक साहित्य अर्पण केले होते!

“कोणी परमेश्वराविरुद्ध खालीलपैकी एखादी गोष्ट करुन पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव म्हणून ठेवलेली वस्तू परत करण्यास खोटे बोलून नकार दिला. किंवा एखाद्याची चोरी केली किंवा कोणाला फसवीले.” किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली किंवा एखादे काम करण्याचे वचन दिले, पण मग ते काम करणार नाही किंवा एखादे वाईट काम केले;

“तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक कापू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका. आपला द्राक्षमळाही झाडुन सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे! “तुम्ही चोरी करु नये, कोणाला फसवू नये व एकमेकाशीं खोटे बोलू नये.

“आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्याला लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.

लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका. तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले!

“तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचूं नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”

सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे; पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरु नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये. तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे.

“तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल. मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे; त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही “योबेल” म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी “योबेल” वर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेल कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत; कारण ते “योबेल” वर्ष होय; ते तुम्हांकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सांपडेल तो उपज तुम्ही खावा.

“तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चेपोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे;

त्याला तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वरदेवाचे भय धर व आपल्या भाऊबंदालाआपल्यापाशी राहू दे. तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.

“भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एकदशांश भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली ह्यांची फळे ह्यांचा एकदशांश भाग परमेश्वराकरिता आहे.

परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, “तुला कुठलीही जमीन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांना मी वचन दिल्याप्रमाणे जमीन मिळेल. पण मी मात्र तुझी भेट आहे. “इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळच्या सर्व गोष्टीतला दहावा हिस्सा देतील. म्हणून तो दहाव्वा भाग मी लेवीच्या सर्व वंशजांना देतो. ते दर्शन मंडपात जे काम करतील त्याचा हा मोबदला आहे.

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळ जे जे आहे त्या सगव्व्याचा दहावा भाग परमेश्वराला देतील. तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस. पिक काढल्यानंतर तुला धान्य देण्यात येईल आणि द्राक्षारसही देण्यात येईल. म्हणून ती तुझी परमेश्वराला देण्यात येणारी अर्पणे असतील. याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वराला अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वराला जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील. इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.

याचा अर्थ असा की आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही. आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही हे योग्य नाही. त्यांचे नाव संपून जाईन कारण त्यांना मुले नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या वडिलांच्या भावांना जी जमीन मिळेल त्यातली थोडी आम्हाला द्या.” तेव्हा मोशेने परमेश्वराला त्याने काय करायला हवे ते विचारले. परमेश्वर त्याला म्हणाला, “सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.” “इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: ‘जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो मेला तर त्याच्या मुलींना त्याचे सर्व काही मिळावे. जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी. जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या. जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.”‘ इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.

म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेशवराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत-बाजूबंद, बांगड्या, आंगठ्या, कुड्या आणि हार. आम्हाला शुद्ध करण्यासाठी या परमेशवराच्या भेटी आहेत.”

तेव्हा इस्राएल लोकांमध्ये जमीन एक कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन जवळ बाळगू शकेल.”

“चोरी करु नका.

“दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दास दासी, गुरे-गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.”

येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहोत. तुम्हाला डोंगरातील तांबे खणून काढता येईल.

त्यामुळे तुम्हाला अन्न धान्याची कमतरता पडणार नाही. चांगली घरे बांधून त्यात राहाल. तुमची गायीगुरे आणि शेळ्या मेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले. विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले. तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला नम्र केले. हे धन मी माझ्याट बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.’ तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे.

कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या नवख्यांनाही साहाय्य करतो. त्यांना अन्न वस्त्र पुरवतो.

तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना झालेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा.

मग परमेश्वर एक ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा-होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा,परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोऱ्हा.

आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.

“दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवी, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल तुमच्या मनात सतत आदर राहिल.

“दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करुन टाकावे. त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करुन टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. परक्याकडून वसुली करावी, पण इस्राएलाला कर्जमाफी द्यावी.

मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांवर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.

“तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या या देशात एखादा माणूस गरीब असेल, त्याला मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.

“कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा मतलबी विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल. “तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल. गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.

मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा.

प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे.

तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.

इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे.

“इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक मांत्रिक, चेटूककरणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही.

“आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका. परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.

“कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.

द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली सुरली द्राक्षेही त्यांच्यासाठीच राहू द्या.

आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली. आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा. त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.

“दर तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तृप्त होतील. या वेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.

“परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल. आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही.

पण सर्व सोनें, रूपें आणि तांब्याची व लोखंडाचीं पात्रें परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.

लेविच्या वंशाला तर मोश्याने वतन दिल्हें नाहीं; इस्राएलचा देव परमेश्र्वर याने जसें त्यांस सानितलें, तसा तोच त्यांचे वतन आहे.

यहोवा दरिद्री करतो व धनवान करतो; तो नीच करतो,तो उंचपि करतो,तो दरिद्र्याला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उङें करतों; यासाठी कीं त्यांना सरदारांमध्यें बसवावे व त्यांना गौरवाते सिंहासन प्रप्त व्हावें;कारण पृथ्वीचे खांब यहोवाचे आहेत, त्यानें त्यांवर जग ठेंवले आहे.

परमेश्वराने नाथानला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, “एका नगरात दोन माणसे होती. एक श्रीमंत होता आणि एक गरीब. श्रीमंत माणसाकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती. पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब माणसाच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली. त्याच्याच अन्नातला घास ती खाई, त्याच्याच कपातले पाणी ती पिई. त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे. त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती. “एकदा एक प्रवासी श्रीमंत माणसाकडे आला. त्या प्रवाश्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत माणसाची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्याला काही काढून घ्यायचे नव्हते. तेव्हा त्याने त्या गरीब माणसाची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या प्रवाश्यासाठी अन्न शिजवले.” दावीदाला या श्रीमंत माणसाचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत. कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्याला दया आली नाही.”

पण राजा अरवनाला म्हणाला, “नाही, तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे. फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.”तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले. मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली. होमबली आणि शांत्यार्पणे केली.परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.

शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोही सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या. अतिपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवले होते.

दोन्ही खोल्यांची जमीन सोन्याने मढवली होती.

शलमोनाने मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यामाठी) चोख सोन्याच्या दीपमाळा. (या अतिपवित्र गाभाऱ्यासमोर डावीउजवीकडे पाच - पाच लावलेल्या होत्या)सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे वाडगे दिवे लखलखीत, उजळलेले ठेवायची साधने. पेले ताम्हने शुद्ध सोन्याची रक्षापात्रे मंदिराची प्रवेशद्वारे.

शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले.

शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्व सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती. राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत. शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वीधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते.

ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, ‘मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.” तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, “तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.” तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.

अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.”तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.” यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.” मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.”पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले. मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.”

हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व चांदी बाहेर काढली. परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि खांब सोन्याच्या पल्याने मढवले होते ते सर्व काढून हिज्कीयाने घेतले आणि हे सोने अश्शूरच्या राजाला दिले.

यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. राजा शलमोनने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले. नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.

याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.

याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढंब, उंट, खेचरं, गुंरं यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुका, द्राक्षारस, तेल, गुरे - मेंढरे असे बरेच काही आणले. इस्राएलमध्ये आनंदीआनंद पसरला होता.

“शलमोन, परमेश्वराच्या मंदिराच्या वास्तूसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. 3,750 टन सोने आणि 37,500 टन चांदी मी जमवली आहे. लोखंड आणि पितळ, तर मोजदाद करणे कठीण इतके आहे. दगड, लाकूड यांचाही साठा मी केलाच आहे. शलमोन, त्यात तू भर घालू शकतोस.

माइया देवाच्या मंदिराची योजना करण्यात मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. सर्व वस्तूंसाठी लागणारे सोने-चांदी, पितळ मी दिलेले आहे. एवढेच नव्हे तर लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि शुभ्र संगमरमर हे ही देऊ केले आहे. परमेश्वराच्या मंदिरासाठी अशा अनेकविध गोष्टी मी दिल्या. हे देवाचे मंदिर बांधून व्हावे असे मला मनापासून वाटते म्हणून सोन्या चांदीची माझी ठेवही मी देत आहे. पवित्र मंदिरासाठी मी हे करत आहे.

देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: 190 टन सोने, 375टन चांदी, 675टन पितळ, आणि 3,750 टन लोखंड. ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्याकडे त्यांनी ती सुपूर्द केली. या सर्व प्रमुख मंडळींनी अगदी मनापासून आणि खुशीने, मुक्तहस्ताने दिले. त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंद पसरला. राजा दावीदालाही आनंद वाटला.

वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच. सर्वांवर तुझा अधिकार आहे. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.

या सगळ्या गोष्टी देणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळालेलेच आम्ही तुला परत करत आहोत.

हे परमेश्वर देवा, तुझे मंदिर उभारायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. तुझ्या सन्मानार्थ आम्ही हे मंदिर बांधत आहोत पण ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.

तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचा नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. तेव्हा ते मी तुला देईनच पण त्याखेरीज मालमत्ता, ऐश्वर्य आणि मासन्मानाही देईन. तुझ्या आधीच्या कोणाही राजाला मिळाले नसेल एवढी संपत्ती व मानसन्मान देईन. पुढेही तुझ्यावढे कोणत्याही राजाला मिळणार नाही.”

यरुशलेममध्ये त्याने चांदीसोन्याचा भरपूर साठा केला.सोने चांदी सामान्य दगडांसारखी विपुल होती तर गंधसरुचे लाकूड पश्चिमेकडच्या डोंगराळ भागात उंबराचे लाकूड असे तितके विपुल होते.

आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले. ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला.

अनेक गरीब लोकांनी आपल्या यहुदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “आम्हाला बरीच मुले बाळे आहेत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.” इतर काही म्हणत होते, “सेध्या दुष्काळ आहे. धान्यासाठी आम्हाला आमची शेंत, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.” आणखी काही म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावर आम्हाला राजाचा कर लागत आहे. पण तो भरणे परवडत नसल्यामुळे आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत. ते श्रीमंत लोक पाहा! आम्ही त्यांच्यासारखेच तर आहोत. त्यांच्या मुलांसारखीच आमची मुले आहेत. पण आम्हांला आमची मुले मुली गुलाम म्हणून विकावी लागली. काहींना तर आपल्या मुलींना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय आहोत. आमची शेती आणि द्राक्षमळे तर गेलेच. ते आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.” या तक्रारी ऐकल्या तेव्हा मला अतिशय संताप आला. पण मी स्वत:ला शांत केले आणि मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही लोकांना जी रक्कम कर्जाऊ देता तिच्यावर व्याज द्यायची तुम्ही या आपल्याच माणसांना बळजबरी करत आहात. ते तुम्ही थांबवले पाहिजे.” मग मी सर्व लोकांना एकत्र बोलावले. त्यांना मी म्हणालो, “आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. तेव्हा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. मी म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. देवाविषयी भय आणि आदर बाळगावा हे तुम्ही जाणता. इतर लोकांसारखी लाजिरवाणी कृत्ये तुम्ही करु नयेत. माझे लोक,माझे भाऊ आणि मी सुध्दा लोकांना पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे. त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता परत करा. त्यांना लावलेले व्याजही तुम्ही परत करा. त्यांना जे पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल तुम्ही कर्जाऊ दिलेत त्यावर तुम्ही एक टक्का व्याज लावले आहे. ते तुम्ही त्यांना परत करा.” यावर ते श्रीमंत लोक आणि अधिकारी म्हणाले, “आम्ही ते परत करु आणि आम्ही त्यांच्या कडून आधिक काही मागणार नाही. नहेम्या, आम्ही तुझ्या म्हणण्याबरहुकूम वागू.”मग मी याजकांना बोलावून घेतले. श्रीमंत लोक आणि अधिकारी जे बोलले त्याप्रमाणे वागण्याचे मी त्यांना देवासमोर वचन द्यायला लावले. मग मी माझ्या वस्त्रावरच्या चुण्या झटकत म्हणालो, “आपले वचन जो पाळत नाही त्या प्रत्येकाची गत देव अशीच करतो. देव त्यांना त्यांच्या घरातून झटकून टाकील. ज्यासाठी त्यांनी कामधंदा केला ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.”माझे सांगून झाले. आणि सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.

“दरवर्षी नेमलेल्या वेळी मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून आम्ही सर्वांनी याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी लाकूड आणायचे आहे. नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्याला हे करायलाच हवे. “आमच्या शेतातले पहिले पीक आणि फळझाडांची पहिली फळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणायची आमची जबाबदारी आहे हे आम्ही कबूल करतो. “नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील गोष्टीही करु: आमचा पहिला पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे पहिले पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू. “तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पुढील गोष्टी आणू: पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहार, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण ते सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग घेतात. लेवी या धान्याचा स्वीकार करतील तेव्हा अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी ते धान्या देवाच्या, मंदिरात आणावे व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावे. इस्राएल लोक आणि लेवी यांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.“देवाच्या मंदिराची आम्ही नीट जपवणूक करु असे आम्ही वचन देतो.”

तिथले लेवी, गायक व द्वारपाल यांना लागणारा धान्याचा एकदशांश भाग, नवीन द्राक्षरस, आणि तेल या गोष्टीही तेथे ठेवल्या जात तरीही एल्याशीबने ती खोली तोबीयाला दिली.

त्यानंतर यहुदातील सर्व लोकांनी पिकाचा एकदशांश वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.

ईयोब जवळ 7000 मेंढ्या, 3000 उंट, 1000 बैल आणि 500 गाढवी होत्या तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशांतील तो सर्वात श्रीमंत माणूस होता. ईयोबची मुले आळीपाळीने आपापल्या घरांत भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलवीत असत.

तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”

दुष्ट माणसाने श्रीमंती गिळली तरी तो ती ओकून टाकेल. देव त्याला ती ओकायला भाग पाडेल.

का? कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यानी बळकावली.

दुष्ट लोक त्यांच्या आयुष्यात यशाचे सुख अनुभवतात. नंतर ते मरतात आणि दु:खी न होता थडग्यात जातात.

कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील. कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील. तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल. तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील.

सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.

“लोक शेतातली हद्द दर्शविणाऱ्या खुणा जास्त जमीन मिळवण्यासाठी सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन दुसऱ्या रानात चरायला नेतात. ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात. ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात. सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते. “गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते अन्नाच्या शोधात लवकर उठतात. ते मुलाबाळांना अन्न देण्यासाठी रात्रीपर्यंत काम करतात. गरीब लोकांना शेतात गवत आणि चारा कापत रात्रीपर्यंत काम करावे लागते. त्यांना श्रीमंतांच्या शेतातली द्राक्षे वेचावी लागतात. त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते. ते डोंगरावर पावसात भिजतात. थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात. दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आईजवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून ठेवून घेतात. गरीबांजवळ कपडे नसतात. म्हणून काम करताना ते उघडेच असतात. ते दुष्टांसाठी धान्याच्या पेढ्ंया वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.

परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मीघाबरतो. “मला माझ्या श्रीमंतीचा कधीच भरंवसा वाटला नाही. देव मला मदत करेल याचा मला नेहमीच विश्वास वाटला. ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही. मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.

देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.

ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.

त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांनासुध्दा ईयोबच्या मालमत्तेतला वाटा मिळाला.

जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.

कधी कधी देव संकटात असलेल्यांना विसरतो असे वाटते. त्या गरीबांना काही आशा नाही असेही वाटते. परंतु देवत्यांना कायमचा कधीच विसरत नाही.

दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात. आधाशी लोक देवाला शाप देतात. अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.

जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील तर तो कर्जावर व्याज आकारत नाही. आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही. जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील.

माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस. माझा वाटा फारच अद्भूत आहे माझे वतन सुंदर आहे.

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.

परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुराक्षित अशी दुसरी जागा नाही.

माझी सर्व हाडे म्हणतील, “परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा, तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”

तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील. परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.

मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत. चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.

चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहातील.

प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.

जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल. परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.

काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत. कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही. स्व:तचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो. सदैव जिवंत राहाण्याचा हक् विकत घेण्याइतका.

व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”

बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका. चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे असे समजू नका आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका.

आमचा राजा असहाय्याला मदत करतो. आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो. गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात. राजा त्यांना जिवंत ठेवतो.

“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर. त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”

परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.

देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. देव त्यांची प्रार्थना ऐकेल.

त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.

माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.

देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो. आणि देव त्या लोकांना महत्व देतो.देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.

त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.

परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो. परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.

मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.

परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.

आधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो.

ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.

तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे. नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.

ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात. ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.

जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा. जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”

मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का? तर मग तू अडकलास. तुला तुझ्या शब्दांनीच अडकवले. तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग. विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस. शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे स्वत:ला सोडव.

माणूस भुकेला असला तर तो अन्नाची चोरी करतो. जर तो पकडला गेला तर त्याला चोरलेल्या अन्नाच्या सात पट अन्न द्यावे लागते. त्याच्या जवळ असेल नसेल ते सर्व त्याला त्याबद्दल द्यावे लागते. पण इतर लोक समजून घेतात. ते त्याच्या बद्दलचा आदर घालवत नाहीत.

माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत. मी खरी संपत्ती आणि यश देते. मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात. मी लोकांना योग्य मार्गावर आणते. मी तयांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन.

जर एखाद्याने वाईट गोष्टी करुन पैसे मिळवले तर ते पैसे कवडी मोलाचे असतात. पण सत्कर्म तुम्हाला मरणापासून वाचवू शकते. परमेश्वर चांगल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना हवे असलेले अन्न देतो. परंतु परमेश्वर वाईट लोकाक़डून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी काढून घेतो. आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल. हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.

संपत्ती श्रीमंत माणसाचे रक्षण करते आणि गरिबी गरिबांचा नाश करते.

चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात. चांगल्या माणसांच्या शब्दामुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल. आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही.

काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.

जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल. .दयाळू आणि कोमल स्त्री आदराला पात्र होते. जे लोक जुलमी आहेत ते केवळ पैसा मिळवतात.

जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल. जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्याना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल. जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो. जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात. जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात. जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील.

आळशी माणसाला गोष्टी हव्या असतात पण त्या त्याला कधीही मिळणार नाहीत. पणे ते खूप कष्ट करतात त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळतील.

काही लोक श्रीमंतीचा आव आणतात पण त्यांच्या जवळ मात्र काहीच नसते. दुसरे लोक आपण गरीब आहोत असे भासवतात पण ते खरोखरच श्रीमंत असतात. श्रीमंत माणसाला जीव वाचवण्यासाठी पैसे मोजावे लागतात पण गरीबांना अशा धमक्या कधीच मिळत नाहीत.

जर एखादा माणूस पैसे मिळवण्यासाठी फसवाफसवी करील तर त्याचे पैसे लवकरच जातील. पण जो माणूस कष्ट करुन पैसे मिळवतो त्याचे पैसे वाढतात.

चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.

गरीबाला मित्र नसतात, शेजारीही नसतो. पण श्रीमंताला खूप मित्र असतात. जो शेजाऱ्याला पाण्यात पाहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा. जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात. जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील. पण जर तुम्ही काही न करता फक्त बोलतच राहिलात तर तुम्ही गरीबच राहाल.

जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते.

चांगले लोक पुष्कळ बाबतीत श्रीमंत असतात. पण दुष्टाकडे ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावर संकटे येतात.

गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते. प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.

जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.

योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे.

ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.

मुबलक अन्नाने भरलेल्या भांडणयुक्त घरापेक्षा कोरड्या भाकरीच्या तुकडा शांतीने खाणे बरे! सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल. सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.

केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल.

गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.

गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.

आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.

जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.

तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल.

जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.

काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल. जर तुम्ही श्रीमंत होण्यासाठी लबाडी केलीत तर तुमची संपत्ती लवकरच नाहीशी होईल आणि तुमची संपत्तीच तुम्हाला मरणाचा मार्ग दाखवील.

जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही.

जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही. दुष्ट लोक चांगल्या माणसांवर जे अत्याचार करतात त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. जे लोक अप्रामाणिक असतात त्यांना प्रामाणिक लोकांवर केलेल्या अत्याचाराची किंमत मोजावी लागते. वाद घालणाऱ्या रागीट बायकोबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले. शहाणा माणूस त्याला लागणाऱ्या गोष्टी साठवून ठेवतो. पण मूर्ख माणूस त्याला मिळालेल्या वस्तू लगेच संपवून टाकतो.

आळशी माणूस अधिकाचा हव्यास धरुन आपला नाश करुन घेतो. तो स्वत:चा नाश करतो कारण तो त्या गोष्टींसाठी कष्ट करायला नकार देतो पण चांगला माणूस दान देतो कारण त्याच्याकडे भरपूर असते.

आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे. गरीब लोक आणि श्रीमंत लोक सारखेच असतात. सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले आहे.

गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो. जो माणूस संकटे पसरवतो तो संकटांचे पीक घेतो. आणि शेवटी त्या माणसाचा नाश होईल त्याने इतरांना दिलेल्या त्रासांमुळेच त्या माणसाचा नाश होईल. जो मनुष्य स्वखुशीने आनंदाने देतो त्याला आशीर्वाद मिळेल. कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.

या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वत:ला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे.

गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका. परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.

दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका. जर तुम्ही त्याचे कर्ज फेडू शकला नाही, तर तुम्ही तुमच्या जवळचे सर्व घालवून बसाल. तुमचे झोपायचे अंथरुण तुम्ही का घालवता?

श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड करु नका. तुम्ही शहाणे असाल तर धीर धराल. पैसा फार लवकर जातो. जणूकाही त्याला पंख फुटतात आणि तो पक्ष्यासारखा उडून जातो.

जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही.

चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात. आणि सर्व मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने खोल्या भरल्या जातात.

“थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.” या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.

तुम्ही जर योग्य वेळी चांगली गोष्ट संगितली तर ते चांदीच्या तबकातले सोन्याचे सफरचंद असेल.

तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला अन्न द्या. तो जर तहानेला असला तर त्याला प्यायला पाणी द्या. तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात.

संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा कायम राहात नसतात.

गरीब असून प्रामाणिक असणे हे श्रीमंत असून वाईट असण्यापेक्षा चांगले असते. जो माणूस कायद्याचे पालन करतो तो हुशार असतो. पण जो माणूस क्षुल्लक माणसांशी मैत्री करतो तो त्याच्या वडिलांना लाज आणतो. जर तुम्ही गरीबांना फसवून श्रीमंत झालात तर तुम्ही लवकरच संपत्ती गमवाल. जो माणूस त्यांच्याशी दयाळू असतो त्याच्याकडे ती जाईल.

श्रीमंत लोकांना नेहमी आपण खूप शहाणे आहोत असे वाटत असते. पण शहाणा असलेला गरीब माणूस खरे काय ते पाहू शकतो.

जो माणूस खूप काम करतो त्याला भरपूर खायला मिळेल. पण जो स्वप्ने बघण्यात वेळ घालवतो तो गरीबच राहील. जो देवाची भक्ती करतो त्याला देव आशीर्वाद देईल. पण जो माणूस फक्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्याला शिक्षा होईल. न्यायाधीशाने नेहमी न्यायी असले पाहिजे. एखाद्याला तो चांगला ओळखतो म्हणून त्याला मदत करता कामा नये. पण काही न्यायाधीश थोड्याशा पैशांसाठी त्यांचे निर्णय बदलतात. स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे. जर तुम्ही एखाद्याला तो चुकतो आहे असे सांगून मदत केलीत तर तो नंतर तुमच्याबद्दल आनंदी होईल. लोकांबरोबर नेहमी गोडगोड बोलण्यापेक्षा हे खूप चांगले. काही लोक त्यांच्या आई वडिलांची चोरी करतात. “ह्यात काही चूक नाही” असे ते म्हणतात. पण तो माणूस घरात येऊन सगळ्याचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच दोषी आहे.

जर एखाद्याने गरीब लोकांना दिले तर त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. पण जर एखाद्याने गरीबांना मदत करायला नकार दिला तर त्याच्यावर खूप संकटे येतील.

चांगल्या माणसांना गरीबांसाठी योग्य गोष्टी करायची इच्छा असते पण दुष्ट लोक मात्र पर्वा करीत नाहीत.

बरोबर काम करणारे दोन चोर एकमेकांचे शत्रू असतात. एक चोर दुसऱ्याला धमकी देईल त्यामुळे जर त्याला जबरदस्तीने कोर्टात खरे बोलावे लागले तर तो बोलायाला खूपच घाबरेल.

खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे. माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल. पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन. त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन.

ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा. सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे.

ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते.

नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले. मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगिचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे लावली. मी माझ्यासाठी तळी निर्माण केली. आणि त्या तव्व्यांचा उपयोग मी माझ्या वाढणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी केला. मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या. मी स्वत:साठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्याच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्य गोष्टी माझ्याजवळ होत्या. मी खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झालो. माझ्या आधी यरुशलेममध्ये राहणाऱ्य कोणाही माणसा पेक्षा मी मोठा होतो आणि माझे शहाणपण मला मदत करण्यासाठी नेहमी तयार होते. माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते. परंतु नंतर मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे पाहिले. मी जे कष्ट केले त्यांच्याकडे पाहिले. आणि ते सर्व म्हणजे वेळेचा अपव्यय होता असे मी ठरवले. वाऱ्याला पकडण्यासारखेच ते होते. आपण जीवनात जे काही करतो त्यापासून काहीही लाभ होत नाही.

जो माणूस पैशावर प्रेम करतो तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्ती बद्दल कधीही समाधानी राहू शकणार नाही. जो माणूस संपत्तीवर प्रेम करतो त्याला अधिक संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. हा ही अविचार आहे.

माणूस त्याच्या आईच्या उदरातून जगात येतो तेव्हा काहीही न घेता येतो. आणि तो माणूस जेव्हा मरतो तेव्हाही तो त्याच प्रकारे जातो. काहीही न घेता. तो गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो पण तो जेव्हा मरतो तेव्हा तो बरोबर काहीही नेत नाही. तो ज्या रीतीने जगात येतो त्याच रीतीने जातो.

जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे.

देव माणसाला खूप संपत्ती, धनदौलत आणि मानमरातब देतो, त्या माणसाजवळ त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी आणि त्याला जे जे हवे ते सर्व असते. परंतु देव त्याला या सगळ्याचा उपभोग घेऊ देत नाही. कोणीतरी अनोळखी येतो आणि सारे काही घेऊन जातो. ही अतिशय वाईट आणि निरर्थक गोष्ट आहे. ळ्य

लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.

म्हणून अगदी पहाटेलाच पेरणीला सुरुवात करा आणि संध्याकाळपर्यंत थांबू नका. का? कारण कोणती गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवेल हे तुम्हाला माहीत नसते. कदाचित तुम्ही जे जे काही कराल ते ते यशस्वी होईल.

दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत. तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात.

ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना व अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.

परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.

“तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. अन्न आणि मद्य ह्यासाठी पैसे पडणार नाहीत. जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता? तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता? माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल. तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.

भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”

भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.

हे भविष्यात घडून येईल. त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील. तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल. प्रथम तू घाबरशील. पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील. समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल. राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल. मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.

“आता तुझ्याजवळ तांबे आहे, मी तुला सोने आणीन. आता तुझ्याजवळ लोखंड आहे, मी तुला चांदी आणून देईन. मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन. तुझ्या खडकांचे लोखंड करीन. मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन. आता लोक तुला दुखावतात, पण तेच तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतील.

यहूदा, तुझा नाश होत आला आहे. मग आता तू काय करीत आहेस? तुझा उत्तम लाल पोशाख तू का घालीत आहेस? तुझे सोन्याचे दागिने तू का घालीत आहेस? तू डोळ्यांचा साजशृंगार का करीत आहेस? तू स्वत:ला सुंदर बनवितेस पण हे वेळेचा अपव्यय करणे आहे. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात. ते तुला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन. ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही. मीच ती त्यांना देईन. का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली. यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली.

बाबेल, तू भरपूर पाण्याच्या ठिकाणी वसली आहेस. तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. पण राष्ट्र म्हणून तुझा शेवट जवळ आला आहे. तुझा नाश करण्याची हीच वेळ आहे.

यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत. ते अन्न शोधत आहेत. तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत. जगण्यासाठी ते असे करीत आहेत. यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा! लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!

ते त्यांच्याजवळील चांदीच्या मूर्ती रस्त्यावर टाकतील. सोन्याच्या मूर्ती त्यांना घाणेरड्या चिंध्यांप्रमाणे वाटतील. का? कारण परमेश्वराच्या क्रोधाग्नीतून त्या मूर्ती त्यांना वाचवू शकणार नाहीत. त्या मूर्ती म्हणजे फक्त लोकांचे पतन व्हावे (पाप करावे) म्हणून रचलेले सापळे होते. त्या लोकांना त्यांच्या मूर्ती अन्न देणार नाहीत व स्वत:चेही पोट भरणार नाहीत.

देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही. सदोम व तिच्या मुली अती गर्विष्ट झाल्या, आणि त्यांनी माझ्या समोर भयानक गोष्टी करण्यास सुरवात केली. मी ते पाहताच त्यांना शिक्षा केली.”

तो सज्जन लोकांचा फायदा घेत नाही, कर्ज देताना गहाण ठेवलेल्या वस्तू, तो कर्जाची परतफेड होताच कर्जदाराला परत करतो. तो सज्जन भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो. एखाद्याला पैसे उसने दिल्यावर, तो त्यावर व्याज घेत नाही. तो कपट करीत नाही. तो सर्वांशीच चांगला वागतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात. तो सज्जन माझे नियम पाळतो, माझ्या निर्णयांवर विचार करतो, तो न्यायी आणि विश्वासनीय होण्याचे शिकतो. तोच चांगला माणूस होय, म्हणूनच तो जगेल.

तो गरीब असहाय्य लोकांना वाईट वागणूक देत असेल, लोकांचा गैर फायदा घेत असेल, गहाण ठेवलेल्या वस्तू कर्जफेडीनंतर कर्जदाराला परत करीत नसेल, तो त्या अमंगल मूर्तीची प्रार्थना करीत असले आणि आणखी काही भयंकर गोष्टी करीत असेल. अशा कितीतरी वाईट गोष्टी तो करीत असेल. एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत: जबाबदार असेल.

“यरुशलेममध्ये, तुम्ही, लोकांना मारण्यासाठी पैसे घेता, उसने पैसे दिल्यास त्यावर व्याज आकारता, थोड्याशा पैशाकरीता शेजाऱ्यांना फसविता. तुम्ही लोक मला विसरले आहात. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

“सामान्य लोक एकमेकांचा फायदा घेतात. ते एकमेकांना फसवितात आणि लुबाडतात. ते गरीब, असहाय लोकांना अगदी क्षुद्र लेखतात. ते परदेशींयांना फसवितात व ह्याबद्दल देशात कायदा अस्तित्वात नसल्याप्रमाणेच वागतात. “मी, लोकांना, त्यांच जीवनमार्ग बदलून, देशाचे रक्षण करण्यास सांगितले. मी तटबंदीची दुरुस्ती करण्यास सांगितले. लोकांना तटबंदीला पडलेल्या भगदाडाजवळ उभे राहून देशाच्या रक्षणाकरिता लढावे, अशी माझी इच्छा होती. पण कोणीही मदतीला आले नाही.

तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:साठी संपत्ती गोळा केली आहेस. तुझ्या खाजिन्यांत तू चांदी-सोने ठेवले आहेस. तुझ्या शहाणपणाने आणि व्यापारामुळे तुझी संपत्ती वाढली आणि आता तुला त्यांचाच गर्व झाला आहे. “म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:सोर, तू स्वत:ला देवासारखी मसजतेस! मी परक्यांना तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन. ते राष्ट्रांमध्ये सर्वांत भयंकर आहेत. ते तलवारी उपसतील आणि तुझ्या शहाणपणाने मिळविलेल्या सर्व सुंदर गोष्टींचा नाश करतील. तुझे वैभव ते लयाला घालवितील.

तू म्हणशील, ‘तटबंदी नसलेल्या शहरांच्या देशावर (इस्राएलवर) मी हल्ला करीन. ते लोक शांतीने राहतात. त्यांना ते सुरक्षित आहेत असे वाटते. त्यांचे रक्षण करण्यास गावांभोवती तट नाही. त्यांच्या वेशींना अडसर नाहीत. खरे म्हणजे त्यांना वेसच नाही. मी त्या लोकांचा पराभव करुन, त्यांची मौल्यावान संपत्ती लुटीन. पूर्वी नाश झालेल्या, पण आता लोक राहात असलेल्या स्थानांशी मी लढेन. इतर राष्ट्रांतून गोळा झालेल्या लोकांशी (इस्राएलशी) मी लढेन. आता त्यांच्याजवळ गुरेढोरे व मालमत्ता आहे. ते जगाच्या चौकात रहातात. शक्तिशाली देशांना इतर शक्तिशाली देशांकडे जाण्यासाठी त्या प्रदेशातून प्रवास करावाच लागतो.’ “शबा, ददान, दार्शीशचे व्यापारी आणि त्यांच्याबरोबर व्यापार करणारी सर्व गावे तुला विचारतील ‘तू मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यास आलास का? चांगल्या गोष्टी बळकावण्यासाठी व सोने, चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता लुटून नेण्यासाठी तू आपल्या सैन्याच्या जथ्याला घेऊन आला आहेस का? सर्व अमूल्य वस्तू घेण्यासाठी तू आला आहेस का?”

राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती. म्हणून यरुशललेमच्या देवाच्या मंदिरातून आणलेले सोन्याचे प्याले त्यांनी आणले.राजा, दरबारी, राण्या व दासी हे त्यातून मद्य प्यायले. मद्य पिता-पिता ते त्यांच्या मूर्तिदेवतांची स्तुती करीत होते.ज्या देवतांची ते स्तुती करीत होते ती दैवते म्हणजे सोने, चांदी, कासे, लोखंड, लाकूड व दगड यापासून बनविलेले पुतळे होते.

ते गर्विष्ठ झाले, त्यांनी माझ्याविरुद्ध खूप पाप केले. म्हणून मी त्यांचे वैभवाचे लाजिरवाण्या स्थितीत रूपांतर करीन.

“याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत. एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’

“मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन. मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.

तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही. का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.

माझे ऐका! तुम्ही असहाय्य लोकांना तुडविता ह्या देशातील गरिबांचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात. तुम्ही, व्यापारीलोक म्हणता “प्रतिपदा केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू शकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हाला गहू विकता येईल? आम्ही किंमत वाढवू शकतो आणि माप लहान करू शकतो तराजू आपल्या सोयीचे करून आपण लोकांना फसवू शकतो. गरीब कर्ज फेडू शकत नाहीत, तेव्हा आपण त्यांना गुलाम म्हणून विकत घेऊ. एका जोड्याच्या किंमतीत आपण त्या असहाय्य लोकांना विकत घेऊ. हो! आणि जमिनीवर सांडलेले गहू आपण विकू शकू.”

त्यांना शेते हवे असतात, म्हणून ते ती घेतात. घरे हवी असतात, म्हणून घरे घेतात. ते एखाद्याला फसवितात. आणि त्याचे घर घेतात. एखाद्याची फसवणूक करुन त्याची जमीन घेतात.

पण लवकरच तो सर्व लोकांच्या चेष्टेचा विषय होईल. ते त्याच्या पराभवाच्या कथा सांगतील. ते हसून म्हणतील, ‘फारच वाईट झाले बुवा! त्या माणसाने खूप गोष्टी चोरल्या. त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी त्याने उचलल्या. पण त्यांचेच आता त्याला ओझे होईल. त्याने कर्ज काढून स्वत:ला श्रीमंत बनवले. “तू (बलवान माणसाने) लोकांकडून पैसा घेतलास. कधी ना कधी त्या लोकांना जाग येईल व काय झाले ते समजेल. मग ते तुझ्या विरुध्द उभे राहतील. तुझ्याकडून वस्तू घेतील व तू भयभीत होशील.

मग इतर लोक त्यांची संपत्ती बळकावतील आणि त्यांच्या घरांचा नाश करतील. त्या वेळी, ज्यांनी घरे बांधली, ते त्या घरात राहणार नाहीत आणि ज्यांनी द्राक्षमळे लावले, त्यांना त्या द्राक्षांचा द्राक्षारस मिळणार नाही. ह्या गोष्टी दुसऱ्यांनाच मिळतील.”

त्यांच्या सोन्या-चांदीची त्यांना मदत होणार नाही. त्या वेळी, परमेश्वर खूपच कोपलेला व रागावलेला असेल. परमेश्वर सर्व जगाचा नाश करील. परमेश्वर पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाशकरील. “

त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.

मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझा पगार द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्यालेखी माझी किंमत एवढी आहे. एवढी मोठी रक्कमतू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली.

“देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करु नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या.”“तुम्ही मला विचारता, ‘आम्ही तुझे काय चोरले?’“तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा एक दशांश भाग द्यायला हवा. खास भेटी द्यायला हव्यात. पण तुम्ही हे मला देत नाही. अशाप्रकारे तुमच्या संपूर्ण राष्ट्राने माझ्या गोष्टी चोरल्या आहेत म्हणूनच तुमच्याबाबतीत वाईट गोष्टी घडत आहेत.” प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “ही परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील दहावा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजिन्यात ठेवा. माझ्या घरी अन्न आणा. माझी परीक्षा घ्या. तुम्ही असे केलेत, तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईन. आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव होईल. प्रत्येक गोष्ट तुम्हांला जरुरीपेक्षा जास्त मिळेल.

नंतर ते त्या घरात गेले आणि ते बाळक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.

“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील.

जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.

लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल.

आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.

तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत, तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका. कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.

मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते.

वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?

येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बि‍ळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”

तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे.

मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.

काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले

काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.

स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतला.

जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?

येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू कर देत नाहीत काय?” त्याने म्हटले, “होय देतो.” मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?” जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.” तेव्हा येशूने त्यास म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”

म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले. जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते. घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?” मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”

येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.

तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.” जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?” येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”

पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?” येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.

म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते. मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन.’ मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले. पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’ त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’ संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’ जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली. मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे एकच नाणे मजुरी मिळाली. त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले. ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात कष्ट केले.’ परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का? जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे. मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’ म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”

मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वाना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. तो त्यांना म्हणाला, असे लिहिले आहे, “माझ्या घरास प्रार्थनेचे घर म्हणतील, पण तुम्ही त्यास लुटारुंची गुहा केली आहे.”

म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.”

परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या.

कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली. त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला. ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या. त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या. पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली. त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्या मनुष्यास दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, मालक, तुम्ही मला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन हजार कमवल्या आहेत. मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत! मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल. नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील.

मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.

मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.

येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमोलवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले. पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला? ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहा? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.

यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.

तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला. तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.” तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली. त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले. मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.”

काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.”

काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”

परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?” तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते.

व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अशुद्ध करतात.”

जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल?

येशूने त्याच्याकडे पाहिले त्यास त्याच्यावर प्रीती केली तो त्यास म्हणाला, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे असेल नसेल ते सर्व विकून आणि गोरगरीबांस देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल आणि मग चल आणि माझ्यामागे ये.” हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती.

येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.” त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतु येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला नाही कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”

पेत्र त्यास म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत.” येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.

नंतर ते यरुशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली. त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही. मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”

ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी की, आपण प्रामाणिक आहात आणि पक्षपात न करता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता हे आम्हास माहीत आहे तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?” परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहीन.” मग त्यांनी त्याच्याकडे एक नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “या नाण्यावरील ही प्रतिमा व हा लेख कोणाचा आहे?” ते त्यास म्हणाले, “कैसराचा.” मग येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे ते कैसराला आणि जे देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्या उत्तराविषयी फार आश्चर्य वाटले.

येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”

येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले. तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. कारण हे सुगंधी तेल तीनशे सोन्याच्या नाण्यापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” असे म्हणून त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली. पण येशू म्हणाला, “तिला एकटे सोडा असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे तेव्हा त्यांना मदत करणे तुम्हास शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही.

जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला.

त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”

काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका. काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.

पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे. जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.

जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका. जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तु हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको.

तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात.

ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात. परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.

द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.

येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले.

दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, “याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.”

आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे,

जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”

पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या आणि नंतर सर्वकाही तुमच्यासाठी शुद्ध होईल. परंतु तुम्हा परूश्यांना हाय असो कारण तुम्ही पुदिना, जीरे व प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नितीने जगावे व देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.

नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!” परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”

नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले. तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’ मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’ आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’ पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’ जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”

मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात! चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे? ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता? रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता. तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय! तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका. कारण जगातील राष्ट्रे हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील.

तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.

कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”

त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.

किंवा एका स्त्रीकडे चांदीची दहा नाणी आहेत आणि जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, “माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.” त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.

मग येशू म्हणाला, एका मनुष्यास दोन पुत्रहोते. त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, “बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या.” आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या.” मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यास म्हणाला, “बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही.” परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले.”

येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला, कोणीएक श्रीमंत मनुष्य असून, त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे? तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही. तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू? शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे. मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे. तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड नंतर दुसऱ्याला म्हटले, “तुला किती देणे आहे?” तो म्हणाला, “वीस हजार किलो गहू” तो त्यास म्हणाला, “ही तुझी हिशोबाची वही घे व सोळा हजार मांड.” अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. मग येशूने म्हणले “मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे

एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील. म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल?

कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.” मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला.

कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते. त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले. श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखःसहन करीत आहे. परंतु अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस. आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की, पित्या, लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव, लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.

जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.

उलट मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व उत्त्पन्नाचा दहावा भाग देतो.’

जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्यास म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्वकाही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्यामागे चल.” पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.

तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”

मग पेत्र म्हणाला, “बघा, आमच्याकडे जे होते, ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आई-वडील किंवा मुलेबाळ सोडली त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”

तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.”

तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’ त्याच्या नगरचे लोक त्याचा व्देष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ मग असे झाले कि, तो राज्य मिळवून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरिता पैसा दिला होता, त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलावीले. पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’ मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’ मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’ धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’ ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’ धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल.

येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला. आणि त्यांना म्हणाला, असे लिहिले आहे की, “माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.”

आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?” ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. यावर कोणाची प्रतिमा व लेख आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”

येशूने दृष्टि वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले. त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”

आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले. तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले. व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.

नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.

चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.

तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्यास धरून देणार होता तो यहूदा इस्कार्योत म्हणाला, “हे सुवासिक तेल तीनशे चांदीच्या नाण्यांस विकून ते गरीबास का दिले नाही?” त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला. यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.”

आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते, ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;

आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.”

तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते. आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले. आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.

आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती. त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.

तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली, मग त्याने त्या किंमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला, आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे? ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यानंतर त्याची आलेली किंमत तुझ्याच स्वाधीन नव्हते काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू मनुष्याशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे.

शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले. “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्यास पवित्र आत्मा मिळेल, असा अधिकार मलासुद्धा द्या.” पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.”

विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.

मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे. अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.”

तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?

पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.

या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे.

अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.

आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. तुमच्यामधील प्रत्येकाने, त्यास यश मिळेल त्या मानाने, प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे.

पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.

आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत.

कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे.

कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले. पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली. आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले.

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.

कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे. सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी, यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात अशी समानता व्हावी. पवित्र शास्त्र म्हणते, “ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता, त्यास जास्त झाला नाही. ज्याने थोडा गोळा केला होता, त्यास कमी पडला नाही.”

म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील.

हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो. तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे. असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.”

आता जो पेरणार्‍याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल. कारण या सेवेचे काम केवळ पवित्रजनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते. या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;

मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो.

कारण, ‘जशी आपणावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे.

फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू. म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.

जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,

जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये. उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्यास त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.

तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेहि पाहा.

तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.

मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तिमान आहे. पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली. मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील.

वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;

सदोदित आनंद करा. नित्य प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.

कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.

त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.

पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.

वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.

या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.

लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक

अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;

हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला. व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे. यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला. आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा. मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्यास (अब्राहामाला) त्याने आशीर्वाद दिला. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते. एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे. एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात. कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.

मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती.

आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”

आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.

दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल.

प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.

कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.” तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही? पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही? आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?

खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात.

माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्‍या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.

तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.

अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.” पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.”

धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत. तुमचे सोनेचांदी मातीमोल झाले आहे. त्याच्यावर चढलेला थर तुमच्याविरुध्द साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे.

पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दुःख करीत आहे आणि ते रडणे सैन्याच्या परमेश्वराच्या कानी पोहोचले आहे. जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात.

म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.

कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.

तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; पण अंतःकरणात गुप्त राहणार्‍या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.

जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.

जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.

पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तू म्हणतो मी सधन आहे, मी ‘संपत्ती मिळविली आहे,’ आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही. मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.

मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षारस यांची हानी करू नकोस.

‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी,’ सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, ‘गुहात’ व डोगरांतील ‘खडकातून लपली;’ आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास ‘लपवा,’

आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी, आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.

आणि पृथ्वीचे ‘व्यापारी’ तिच्याकरता ‘रडतील आणि शोक करतील;’ कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही. सोन्याचा, रुप्याचा, हिर्‍यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे; दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षारस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व ‘मनुष्यांचे जीव,’ हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही. आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत; सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत.

आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील आणि म्हणतील, हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिर्‍यामोत्यांचा साज घालीत असे. एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे. आणि सगळे ‘तांडेल,’ गलबतावरचे सगळे लोक आणि ‘खलाशी आणि जितके समुद्रावर’ पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर ‘उभे राहिले,’

आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो ‘तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या’ झर्‍याचे ‘पाणी फुकट’ देईन.

आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो ‘फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.’

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net